उमरखेड बसस्थानकाजवळ इसमाचा मृतदेह आढळला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उमरखेड : शहरातील नांदेड रोडवरील बसस्थानक परिसरालगत असलेल्या एका मेडिकल दुकानासमोर बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चौकशीअंती मृत इसमाची ओळख रामराव पांडुरंग शिंदे (वय ४०, रा. पळसपूर, ता. हिमायतनगर) अशी पटली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पुढील तपासासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
या घटनेप्रकरणी जमादार नरेंद्र पुंड यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
News - World




Petrol Price




