अल्पवयीन दुचाकी चालकांविरुद्ध वाहतूक शाखेची धडक कारवाई : ६५ वाहने जप्त, पालकांचे समुपदेशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर वाहतूक शाखेने अल्पवयीन दुचाकी चालकांविरुद्ध विशेष धडक मोहीम राबविली. या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ अल्पवयीन चालकांकडील दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
कारवाईनंतर सर्व अल्पवयीन चालकांच्या पालकांना वाहतूक शाखेत बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देण्याचे गंभीर परिणाम समजावून सांगितले. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आणि वैध वाहनचालक परवाना नसताना मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले.
समुपदेशनानंतर प्राथमिक स्वरूपात जप्त करण्यात आलेली वाहने पालकांच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, ही कारवाई केवळ जनजागृतीपुरती असून भविष्यात अल्पवयीन वाहन चालविताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित चालक, वाहनमालक आणि पालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
शहर सुरक्षित आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे टाळावे, असे आवाहन चंद्रपूर वाहतूक शाखेने केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




