गडचिरोलीत पाच दिवस महासंस्कृती महोत्सव : अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महासंस्कृती महोत्सवांतर्ग़त गडचिरोलीकरांसाठी पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नागरिकांना यात सहभागी करून घेण्यासाठी कार्यक्रमाचे व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी आज दिल्या.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन १६ फेब्रुवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात करण्यात आले आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा पाटील यांनी आज घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी, कुरखेडा, विवेक सांळुके तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थितीमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, रामदास आंबटकर, डॉ. अभिजीत वंजारी, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे यांची उपस्थिती राहणार आहे.
महासंस्कृती महोत्सवात शुक्रवार १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नक्षत्रांचे देणे हा सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सारेगम विनर प्लेबॅक सिंगर ऋषिकेश रानडे व फिल्मफेयर अवार्ड विजेत्या गायीका आनंदी जोशी सादर करणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी जागर लोक कलेचा, दंडार, गोंधळ, रेला नृत्याचे सादरीकरण झाडीपट्टी ग्रुपचे हरीश चंद्रा बोरकर तर मेघा घाडगे व सहकलाकार लावणी सादर करणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी बिरसा मुंडा यांची जीवनगाथा या महानाट्याचे सादरीकरण होईल. १९ फेब्रुवारी रोजी समीर चौगुले आणि सहकाऱ्यासंकडून हास्य जत्रा कार्यक्रमाचे तर मंगळवार २० फेब्रुवारी रोजी कूवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित झाडीपट्टी महानाटकाचे सादरीकरण होणार आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
News - Gadchiroli