महा आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी : मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य अमृत महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय महा आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिल्या.
आगामी २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत वर्धा येथील बच्छराज धर्मशाळा येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांची नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा, तपासणी साहित्य, संदर्भ सेवा, रुग्ण वाहतूक व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, औषध निर्माण अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना या शिबिराचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.
यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांकडून पात्र लाभार्थ्यांची यादी मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पराग सोमण यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व गरजू नागरिकांनी या महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




