माजरी कॉलरीत अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांचा प्रहार : दोघे अटकेत, महिला विक्रेती फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी कॉलरी परिसरात गांजाची अवैध विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत समधन सिंग रामसिंग टाक ३३ वर्षे रा. गोकुलनगर, वणी, जि. यवतमाळ व रोशन तेजराम मेश्राम २३ वर्षे दुर्गापूर, चंद्रपूर या दोघांना अटक केली आहे.
या कारवाईत १२२.६४ ग्रॅम गांजा, मोपेड, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गांजा विक्री करणारी उषादेवी शिवशंकर वर्मा ४५ वर्षे रा. बांधा दफाई, माजरी कॉलरी ही महिला फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकासह उषादेवी वर्मा यांच्या घरी छापा टाकण्यासाठी जात असताना त्यांच्या घराजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या टीव्हीएस ज्युपिटर क्रं. एमएच ३४ व्हीवाय ४०५७ या मोपेडवरील दोघांची तपासणी करण्यात आली.
मोपेडच्या डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये १२२.६४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर आरोपींची अंगझडती घेतली असता समधन सिंग टाक याच्याकडून २५० रुपये रोख, तर रोशन मेश्राम याच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेडही ताब्यात घेण्यात आली.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी हा गांजा उषादेवी शिवशंकर वर्मा हिच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ती सध्या फरार आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत.
या कारवाईत ३,७०० रुपयांचा गांजा, ७५ हजार रुपयांची मोपेड, १० हजार रुपयांचा मोबाईल आणि २५० रुपये रोख असा एकूण ८८,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३२/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास माजरी पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी चे ठाणेदार सुबोध वंजारी, पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, पोअं चेतन मडावी, अनिस शेख, रविंद्र कन्नाके, प्रमोद मिलमिले, सुरज वासेकर, अशोक नायर, मपोअं वैष्णवी भुरसे, नितिक्षा प्रधान यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




