महत्वाच्या बातम्या

 कारागृहातील बंदिस्त नक्षलवादी, नक्षलसमर्थकांनाही आत्मसमर्पण योजना लागू करा : मुख्यमंत्रींकडे शेकापचे नेते रामदास जराते यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील विविध कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या अटकेतील नक्षलवादी व नक्षलसमर्थकांनाही शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात जराते यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे देशात आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा मोठ्या प्रमाणात बिमोड झाला आहे. अनेक वरिष्ठ जहाल नक्षलवादी (कॅडर) यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहाचा स्वीकार केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या अनेक सामान्य नक्षलवादी आणि नक्षलसमर्थकांनाही त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेबाबत पश्चात्ताप होत असल्याचे दिसून येत आहे.

जराते यांनी सांगितले की, कारागृहात असलेल्या एका अटकेतील नक्षलवादी-नक्षलसमर्थकाने त्यांना लिहिलेल्या पत्रातून संघटनेत काम केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेत आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्याचा विचार करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी पुरेशा पुराव्याअभावी किंवा निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अटकेतील नक्षलवादी अथवा नक्षलसमर्थकांची मुक्तता केली आहे. तसेच अटकेत असलेल्या बहुतांश व्यक्ती या आदिवासी, अर्धशिक्षित असून नक्षल संघटनांसाठी केवळ जेवण पोहोचविणे, साहित्याची ने-आण करणे किंवा इतर किरकोळ स्वरूपाची कामे करणाऱ्या असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ देता येईल का, याची सखोल पडताळणी करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

याचबरोबर शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विस्थापितांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या डाव्या लोकशाहीवादी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राजकीय द्वेषातून शहरी नक्षलवादी म्हणून हिणविण्याचा अपप्रचार वाढत असल्याची खंतही जराते यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात जवळपास संपुष्टात आलेला नक्षलवाद पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी शहरांमध्ये राहून नक्षल संघटनांसाठी काम करणाऱ्या घटकांविरोधात प्रभावी कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आत्मसमर्पण केलेल्या वरिष्ठ नक्षल कॅडरकडून शासनाला मिळालेल्या माहितीचा उपयोग करून नक्षल संघटनांना निधी व शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या जाळ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.

कारागृहातील बंदिस्त नक्षलवादी व नक्षलसमर्थकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानवीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचारात घेऊन शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा रामदास जराते यांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos