महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता जमा


- जिल्ह्यातील २ लक्ष ४४ हजार ७९६ पात्र शेतक-यांना लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लक्ष ४४ हजार ७९६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २४ व्या हप्त्याची रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथे आज ऑनलाइन समारंभाद्वारे देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे वार्षिक ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील २४ व्या हप्त्याचे वितरण ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

रक्कम जमा झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय संख्या : चंद्रपूर जिल्ह्यातील २ लक्ष ४४ हजार ७९६ पात्र शेतक-यांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील ६५२७ पात्र लाभार्थी, बल्लारपूर तालुका (३००६ लाभार्थी), मूल (१७६७५), सावली (२२०२७), वरोरा (२२००४), भद्रावती (१२१५९), चिमूर (३२१७६), नागभीड (२३०५४), ब्रम्हपुरी (३५१४३), सिंदेवाही (१६६२८), राजुरा (१२५८२), कोरपना (१२१६९), जिवती (५३१८), गोंडपिपरी (१३२९६), पोंभुर्णा ९७५९) व इतर ३७३ पात्र शेतक-यांचा समावेश आहे.

कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे आयोजन : भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम किसान) या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बारसकांटा, गुजरात येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य वितरित करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतक-यांना दुष्काळ परिस्थीतीमध्ये रब्बीचे व्यवस्थापन व चारा व्यवस्थापन कसे करावे, तसेच ई-केवायसी, आधार संलग्न बँक खाते, लाभार्थी स्थिती तपासणी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी व महिला शेतक-यांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांचे दूरद्ष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन : शेतक-यांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज देशातील ९ कोटी ३४ लक्ष शेतक-यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे १८ हजार ६९० कोटी रुपये जमा करण्यात येत आहे. शेतकरी हे विकसीत भारताच्या मजबूत स्तंभापैकी एक आहे. सरकारने शेतक-यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. सिंचनावर शेतक-यांचा खर्च कमी व्हावा, यासाठी सौर उर्जा कृषी पंपांना प्राधान्य देण्यात येत आहे. शेती ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी मधक्रांती, (शहद उत्पादन) यामुळे महिला बचत गटांची उन्नती कशी होईल, यावर भर दिला. शेतक-यांनी पारंपारिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून शेती अधिक उत्पादनक्षम, शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.





  Print






Related Photos