नांदा येथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा जप्त : १.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, मुख्य आरोपी फरार


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने कोरपना तालुक्यातील नांदा येथे मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू, जर्दा, सुपारी व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १ लाख ३९ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने १९ मे रोजी गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घातली होती. त्यावेळी गुप्त माहितीच्या आधारे नांदा येथील वार्ड क्रमांक ५ मधील एका घरावर छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान घरातील पानमटेरियल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवलेले आढळून आले. घराचा झडतीत विविध कंपन्यांचा तंबाखू, सुगंधी सुपारी, जर्दा, इलायची व पानमसाल्याचे शेकडो पाकिटे, डबे आणि बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त मालामध्ये ईगल तंबाखू, मजा १०८, राजनिवास, विमल, राजश्री, पान पराग, रजनीगंधा, ब्लॅक लेबल, अॅक्शन आदी ब्रँडच्या वस्तूंचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान घरात उपस्थित असलेल्या सगिर अहमद सिद्दीकी (५५) यांची चौकशी केली असता जप्त करण्यात आलेला माल हा त्यांचा मुलगा समिर अहमद सिद्दीकी (२५) याचा असून तो विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, समिर सिद्दीकी हा त्या वेळी घरात नसून बाहेरगावी गेल्याचे समोर आले.
प्राथमिक तपासात आरोपीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा करून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम ३०(२)(अ), २६(२)(i), २६(२)(iv) आणि ५९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस हवालदार अजय बागेसर, किशोर वैरागडे व पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे यांनी केले. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




