महत्वाच्या बातम्या

 झिंगानूर वनविभागाची मोठी कारवाई : २.१५ लाखांचा बेकायदेशीर सागवान लाकूडसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / झिंगानूर : स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वनविभागाने एक मोठी कारवाई करत सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर लाकूडसाठा जप्त केला आहे. गुरुवार, १८ जून रोजी एकाच वेळी ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापेमारी करून हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत. झिंगानूर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या लाकडाची साठवणूक केली गेल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तातडीने चक्र फिरवून गुरुवारी एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या छाप्यासत्रात सागुनी (सागवान) लाकडाचे दांडे, तयार खिडक्या आणि दरवाजांच्या चौकटी असा एकूण २ लक्ष १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

वनविभागाने अत्यंत गोपनीयतेने ही मोहीम आखल्यामुळे लाकूड तस्करांना पळ काढण्याची संधीच मिळाली नाही. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला असून, हा बेकायदेशीर लाकूडसाठा नेमका कोणाचा होता, याचा कसून तपास केला जात आहे. 

सध्या सर्व आरोपी फरार असून वन अधिकाऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू आहे. ही धडक कारवाई झिंगानूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भारत निमगडे आणि वनरक्षक सोनू वाढई यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos