वाठोड्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १५ जणांवर गुन्हा, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : वाठोडा पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, पत्त्यांचा संच, मोबाइल फोन व इतर साहित्य असा एकूण ९० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै दुपारी ३.३० ते ३.४५ वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माँ गंगा सेलिब्रेशनजवळील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही व्यक्ती पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी कार्तिक सपाटे, मंगेश खंडारे, शहबाज शेख, अजिंक्य लोढे, आशिष काळे, राजेंद्र जांगळे, अर्शद शेख, अमोल सोनडकर, मंगेश मेहर, अनुराग हिरणखेडे, राहुल जाधव, ओंकार पराते, अंशुल चिंचुलीकर, प्रतीक तल्हार आणि पारस चौधरी यांना ताब्यात घेतले.
जुगाऱ्यांकडून पोलिसांनी १२ हजार ३२० रुपये रोख, पत्त्यांचा संच, १० मोबाइल फोन तसेच अन्य साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९० हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलिसांकडून सुरू आहे.अवैध जुगार व गैरप्रकारांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




