धावत्या एसटी बसचा मागील पत्रा निखळला : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


- चंद्रपूर यांत्रिकी विभागाकडून चौकशी; प्रादेशिक व्यवस्थापकांची अहेरी आगाराला भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : अहेरी आगाराच्या एसटी बसचा मागील पत्रा धावत्या अवस्थेत अचानक निखळून रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी ६ सायंकाळी एटापल्ली शहरात घडली. बसचा वेग कमी असल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस भरधाव वेगात असती, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी आगाराची बस एटापल्ली शहरातून मार्गक्रमण करत असताना अचानक बसचा मागील लोखंडी पत्रा निखळून रस्त्यावर पडला. या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षितरीत्या थांबविल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
घटनेची गंभीर दखल घेत चंद्रपूर येथील यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. बसच्या मागील भागाचा पत्रा नेमका कोणत्या कारणामुळे निखळला, बसच्या देखभाल व दुरुस्तीत काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचा तपास करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी नागपूर विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी अहेरी आगाराला भेट देऊन संबंधित बसची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बसच्या तांत्रिक तपासणी व देखभालीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, बसची नियमित तपासणी आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
News - Gadchiroli




Petrol Price




