चिमुकल्या वंशचा नाल्यात आढळला मृतदेह : आईच्या मृत्यूने आधीच हादरलेल्या कुटुंबाला दुसरा धक्का


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील सरदार पटेल वॉर्ड येथे बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय मुलाचा मृतदेह घराशेजारील नाल्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या बालकाच्या आईचे नागपूर येथे उपचारादरम्यान शनिवारी रात्री निधन झाले होते. त्यामुळे एका कुटुंबावर सलग दोन मोठे आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंश रितेश उर्फ दीपक सूर्यवंशी (८ वर्षे) हा मुलगा शनिवार, १३ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याचा नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोध घेतला. मात्र तो सापडत नसल्याने त्याचे आजोबा शितल छगू सूर्यवंशी यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बालकाच्या अपहरणाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबविली.
रविवारी सकाळी सुमारे ६ वाजता घराजवळील नाल्याकडे गेलेल्या काही नागरिकांना पाण्यात एका बालकाचे डोके तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला.
दरम्यान, वंशची आई ८ जून रोजी जळाल्याने गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे. आईच्या निधनाची बातमी कुटुंबाला मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच वंशचा मृतदेह आढळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वंशचा मृत्यू नाल्यात बुडाल्याने झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दुहेरी शोकांतिकेमुळे बल्लारपूर शहरात शोककळा पसरली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




