अहेरी प्रभाग ९ पोटनिवडणुकीत भाजपाकडून मायाताई येल्लूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माया शंकर येल्लूरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, नगर पंचायत अहेरी यांच्याकडे अधिकृतरित्या अर्ज सादर केला.
अहेरी नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका सुनीता किशोर मंथनवार यांच्या काही महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाल्याने प्रभाग क्रमांक ९ मधील जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी येत्या २० जून रोजी पोटनिवडणूक होणार असून, त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अहेरी शहरातील भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पक्षाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
भाजपाने माया येल्लूरकर यांच्यावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली असून, प्रभागातील विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत निवडणूक लढविणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




