महत्वाच्या बातम्या

 रक्तदानातून मानवतेचा संदेश : बल्लारपूर पंचायत समितीच्या शिबिरात ४० जणांचे रक्तदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान हेच जीवनदान हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या बल्लारपूर पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजे खांडक्या बल्लाळशाह सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.

शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अर्जून पावरा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सचिन माळवी, आरोग्य विस्तार अधिकारी साहेबराव पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा साळवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी वर्हाटे तसेच सहाय्यक प्रशासनिक अधिकारी आनंद सातपुते उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी अर्जून पावरा यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक सक्षम नागरिकाने नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. रक्ताची गरज कोणालाही आणि कधीही भासू शकते. अशा वेळी रक्तदात्यांचे योगदान अनेकांचे प्राण वाचविणारे ठरते, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी स्वतः आतापर्यंत ५१ वेळा रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.

वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील रक्तपेढीच्या पथकाने रक्तसंकलनाची प्रक्रिया पूर्ण केली. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रक्तसाठा वाढण्यास मदत होणार असून गरजू रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.





  Print






News - Chandrapur




Related Photos