तलावात बुडालेल्या युवकाचा २४ तासांनंतर मृतदेह सापडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : तालुक्यातील धानोरी येथील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे २४ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर सोमवारी दुपारी युवकाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृत युवकाचे नाव पंकज दिलीप वाटगुरे २२ वर्ष असे असून, तो २ ऑगस्ट रोजी धान रोवणीचे काम आटोपल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधार आणि पाण्याची अधिक खोली यामुळे रविवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी एसडीआरएफच्या पथकाने, मोटारबोट तसेच स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. सुमारे आठ तासांच्या प्रयत्नांनंतर तलावातील चिखलात रुतलेला मृतदेह मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला आणि बाहेर काढण्यात आला.
घटनास्थळी नायब तहसीलदार वैभव आंबेकर, कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ, पुराडाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मैहस्कर तसेच महसूल व पोलीस प्रशासन उपस्थित होते.मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उत्तरीय तपासणी करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




