धान रोवणीच्या बांधावर पोहोचल्या जिल्हाधिकारी : महिला शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगामातील धान रोवणीच्या कामाला वेग आला असताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी तळोधी (बा.) येथे प्रत्यक्ष धानाच्या शेतात जाऊन महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. चिखलात उभे राहून दिवसभर मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंदर्भातील समस्या आणि अपेक्षा त्यांनी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
चंद्रपूर हा राज्यातील प्रमुख धान उत्पादक जिल्हा असून सध्या जिल्ह्यात धान रोवणीची लगबग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी तळोधी (बा.) येथील शेतांमध्ये भेट देत महिला शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पावसाचे स्वरूप, शेतीसाठी आवश्यक सुविधा, शासकीय योजनांचा लाभ, सिंचन व्यवस्था तसेच शेतीतील विविध अडचणींबाबत त्यांनी महिलांकडून माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी पंत यांनी शेतकऱ्यांच्या समस्या केवळ कार्यालयात बसून न ऐकता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, नागरिकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या अडचणींचे संवेदनशीलतेने निराकरण करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
दौऱ्यादरम्यान त्यांनी तळोधी (बा.) येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून ऑनलाइन धान्य वितरण व्यवस्थेची तपासणी केली. त्यानंतर कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. नगर परिषद क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यावरण संवर्धन आणि त्यातून शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाबाबत कृषी विभाग, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यानंतर अपर तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेताना नागरिकांना शासकीय सेवा विहित कालावधीत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यावेळी तहसीलदार शेखर पुनसे, अविनाश शेमबटवाड, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी श्री. चांदेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




