महत्वाच्या बातम्या

 मुक्ताई वॉटरफॉलला निघालेल्या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू, दोघी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाका फाटा परिसरात मुक्ताई वॉटरफॉल येथे सहलीसाठी निघालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन दुचाकींना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वॅगनआर कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी भीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील मैथली संतोष सावंत १९ वर्षे ही तिचे महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणी मोहित दिनेश घटारे, ध्वनी गजानन कामडे, खुशी हरिदास इगळे, रिया राजू देवागीरकर  २१ वर्षे आणि ट्विनकल किशोर चिकाटे यांच्यासह दोन दुचाकींवरून २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुक्ताई वॉटरफॉल येथे सहलीसाठी निघाली होती.

टाका फाटा परिसरात सर्वजण पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या राखाडी रंगाच्या वॅगनआर कारने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

अपघातात मैथली सावंत हिच्या पायाला, हाताच्या कोपराला व डोक्याला दुखापत झाली, तर रिया देवागीरकर हिच्या डोक्याला गंभीर मार लागला. ट्विनकल चिकाटे हिलाही दुखापत झाली. ध्वनी कामडे हिने तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान रिया राजू देवागीरकर हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमी मैथली सावंत हिला पुढील उपचारासाठी धंतोली येथील शंकरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

या प्रकरणी स्नेहलता वनमाली सामल यांनी दिलेल्या तक्रारीवरून भीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वॅगनआर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos