दिल्ली पोलिसांचे अधिकारी असल्याची बतावणी : निवृत्त प्राचार्यांची ९ लाखांची सायबर फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिल्ली पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत बल्लारपूर येथील एका निवृत्त प्राचार्याची ९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी १६ जुलै २०२६ रोजी फिर्यादी यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी चरणदास गणपत गायकवाड ८० वर्षे हे विद्यानगर वार्ड, पाली बुद्धविहार मागे, बल्लारपूर येथे वास्तव्यास असून ते कर्मवीर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, येनबोडी येथून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
२ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. संबंधिताने स्वतःला दिल्ली पोलिसांचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या नावाने दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्यात आले असून त्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा पैसा जमा झाल्याचा दावा केला. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, अटक होईल व तीन ते सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी भीती दाखवत ऑनलाइन चौकशीच्या नावाखाली त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी फिर्यादींकडून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेतल्यानंतर १४ जानेवारी २०२६ रोजी आरबीआयकडून पडताळणीसाठी रक्कम जमा करावी लागेल व चौकशी पूर्ण झाल्यावर ती परत मिळेल, असे सांगून आरटीजीएसद्वारे ९ लाख रुपये आयसीआयसीआय बँकेतील एका खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यातून ९ लाख रुपये संबंधित खात्यावर हस्तांतरित केले.
यानंतर आरोपी २९ जानेवारी २०२६ पर्यंत व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होते. त्यानंतर त्यांनी संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय सायबर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवून व्यवहाराची पावती, व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट, बँक पासबुकाची प्रत व सायबर तक्रारीची प्रत पोलिसांकडे सादर केली.
फिर्यादींच्या तक्रारीवरून १६ जुलै रोजी बल्लारपूर पोलिसांनी व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह फसवणूक व धमकीच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




