महत्वाच्या बातम्या

 आलापल्ली–सिरोंचा ३५३-सी राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट कामाचा आरोप : पुलांच्या दर्जावर गंभीर प्रश्न


- टाचे मारून राफ्ट वाढवण्याचा प्रकार, तांत्रिक मानकांची पायमल्ली झाल्याचा नागरिकांचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आलापल्ली : आलापल्ली ते सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पात आता पुलांच्या बांधकामाच्या दर्जावरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेकेदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमताने निकृष्ट काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

पुलांच्या बांधकामात गंभीर तांत्रिक चुका झाल्याचा आरोप -
महामार्गावरील पुलांचे बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुलाचा पाया मजबूत करणारा राफ्ट एका ठिकाणी टाकण्यात आला असून, पुलाची मुख्य भिंत (वॉल) मात्र दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला जात आहे. तांत्रिकदृष्ट्या ही गंभीर चूक असून, भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याची भीती व्यक्त होत आहे.

टाचे मारून राफ्ट वाढवल्याचा आरोप -
या त्रुटी उघड झाल्यानंतर मूळ रचनेतील त्रुटी लपवण्यासाठी कंत्राटदाराकडून टाचे मारून म्हणजेच जुगाड पद्धतीने राफ्ट वाढवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अशा पद्धतीने केलेले काम दीर्घकाळ टिकेल का, आणि ४० ते ८० टन वजनाच्या जड वाहनांचा भार पेलू शकेल का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कन्सल्टन्सी आणि अभियंत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह -
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कामाच्या देखरेखीकरिता नेमण्यात आलेल्या कन्सल्टन्सी आणि सरकारी अभियंत्यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत आहे. डिझाईन आणि मानकांनुसार काम न होता देखील कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. या सर्व प्रक्रियेत आर्थिक हितसंबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

जड वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर -
हा महामार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी नसून ४० ते ८० टन वजनाची अवजड वाहने या मार्गावरून नियमितपणे धावणार आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणी तात्पुरते रस्ते आणि पाईप वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत मुख्य पुलांची सध्याची स्थिती धोकादायक असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

चौकशी व कारवाईची मागणी -
संपूर्ण प्रकल्पाची स्वतंत्र व सखोल तांत्रिक चौकशी करून, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता, मंजूर नकाशे आणि प्रत्यक्ष काम यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दोषी ठेकेदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos