जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवतींना मदतीचा हात


- ९० विद्यार्थ्यांना सायकली; ६० युवक-युवतींना स्वयंरोजगार किटचे वाटप, तीन बचत गटांना वाद्य साहित्य संच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांसाठी विविध साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात ९० शालेय विद्यार्थ्यांना सायकली, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना टू-व्हिलर रिपेअरिंग व फास्टफूड व्यवसायासाठी आवश्यक किट, तसेच तीन बचत गटांना वाद्य साहित्य संच वितरित करण्यात आले.
आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा, कला आणि साहित्य यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे. याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
९० विद्यार्थ्यांना सायकली; शैक्षणिक साहित्याचेही वाटप -
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना होणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते ९० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
यासोबतच इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
६० युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय किट -
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. गडचिरोली पोलीस दल आणि बँक ऑफ इंडिया आरसेटी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींसाठी ३० दिवसांचे टू-व्हिलर रिपेअरिंग आणि १२ दिवसांचे फास्टफूड व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० प्रशिक्षणार्थींना टू-व्हिलर रिपेअरिंग आणि फास्टफूड व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक किटचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या साहित्याच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे
याशिवाय तीन बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले. या साहित्यामुळे दुर्गम भागातील युवक-युवती व बचत गटांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळणार असून, स्वावलंबनाच्या दिशेने त्यांना मदत होणार आहे.
शिक्षणावर लक्ष केंद्रित करा, आत्मनिर्भर बना -
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी या साहित्याचा उपयोग करून स्वावलंबी व्हावे आणि आर्थिक उन्नती साधत आत्मनिर्भर बनावे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल नेहमीच कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रोजेक्ट उडानमधून हजारो युवकांना कौशल्य प्रशिक्षण -
गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना उच्च दर्जाचे व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट उडान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत पोलीस दलाकडून उपक्रम राबविले जात आहेत.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपर्यंत १६ हजार ७०८ युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ मिळवून देण्यात आला असून, १ हजार ५४२ नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ७५ सार्वजनिक वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ४ हजार ७९६ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सुरक्षा रक्षक तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण १४ लाख ९ हजार ५३२ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
३०० हून अधिक विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांची उपस्थिती -
या कार्यक्रमाला ३०० हून अधिक शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक उपस्थित होते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने, युवकांना कौशल्य प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्य आणि बचत गटांना व्यवसायासाठी पूरक साधने उपलब्ध करून देण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती -
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके यांच्यासह सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन, युवक-युवतींना कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि बचत गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक साधने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
News - Gadchiroli




Petrol Price




