महत्वाच्या बातम्या

 नवरात्र विसर्जनाच्या तारखांवरून मंडळांमध्ये संभ्रम : २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी देण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : नवरात्रोत्सव विसर्जनाच्या तारखांवरून सार्वजनिक मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, मंडळांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन २२ व २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुका काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दिवस वगळून इतर दोन दिवशी विसर्जनाची परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सव श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे. यंदा नवमी व दशमी तिथीला भाविकांचे उपवास असल्याने २१ ऑक्टोबर रोजी विसर्जन आणि महाप्रसादाचे आयोजन करणे अनेक मंडळांना शक्य नसल्याचे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे बहुतांश सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी २२ व २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुका काढण्याचे नियोजन केले होते.

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मंडळांनी विसर्जन मिरवणुका आणि महाप्रसादासाठी हजारो रुपयांची तयारी केली होती. महाप्रसादाचे बुकिंग, आवश्यक साहित्याची खरेदी आणि अन्य व्यवस्थांवर खर्च करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाकडून २१ ऑक्टोबर रोजीच विसर्जन करण्याचे निर्देश देण्यात आल्याने मंडळांसमोर अडचण निर्माण झाली आहे. ऐनवेळी नियोजन बदलल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून, भाविकांच्या धार्मिक भावनांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे. याची जाणीव सार्वजनिक मंडळांना असून, निवडणुकीच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यास मंडळे सहकार्य करतील. त्यामुळे निवडणुकीचा दिवस वगळून २२ व २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुका काढण्याची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

पोलीस प्रशासनाने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या अडचणी, आर्थिक नुकसान आणि भाविकांच्या श्रद्धेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. तसेच मंडळांना विश्वासात घेऊन विसर्जन मिरवणुकांसाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास नवरात्रोत्सवाची सांगता शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





  Print






Related Photos