महत्वाच्या बातम्या

 विदर्भात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा : नागपूर शहरासह चार तालुक्यांतील शैक्षणिक संस्थांना २९ जुलैला सुटी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलत नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २९ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने २९ जुलैसाठी नागपूर जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. शाळा, महाविद्यालये तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश देण्यात आले असून नागरिकांनीही हवामान विभाग व प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

३० जुलैलाही नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट -
हवामान विभागाने ३० जुलै रोजीही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गावपातळीवरील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भंडारा आणि गोंदियात अतिवृष्टीची नोंद -
गेल्या २४ तासांत विदर्भातील सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली. तर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे १०३.४ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून काही भागांत जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय हवामानाचा इशारा -
हवामान विभागाने २९ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

३१ जुलै रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन -

सततच्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये, वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos