चिखलमय पर्यायी रस्त्यांमुळे पुन्हा अपघाताची भीती : जीआयएल (GIL) कन्स्ट्रक्शनच्या कामावर नागरिकांचा संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-बामणी-राजुरा-लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम जीआयएल (GIL) कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी वळण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून दुचाकीस्वार वारंवार घसरून पडत आहेत. त्यामुळे या मार्गावर पुन्हा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे पुलाजवळ तात्पुरते वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये चिखल आणि पाणी साचत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी याच मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका आईसह तिच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही पर्यायी रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या अनेक दुचाकीस्वार चिखलामुळे घसरून पडत असून किरकोळ अपघातांची मालिका सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
महामार्गाच्या बांधकामादरम्यान पर्यायी रस्ते सुरक्षित ठेवणे ही संबंधित बांधकाम कंपनीची जबाबदारी असते. मात्र जीआयएल (GIL) कन्स्ट्रक्शनकडून वळण रस्त्यांच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप वाहनचालक आणि नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळ्याचा जोर वाढत असल्याने पर्यायी रस्त्यांवर तातडीने मुरूम व खडी टाकून खड्डे बुजवावेत, चिखल हटवून रस्ता सुरक्षित करावा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आणखी एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित बांधकाम कंपनी आणि प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




