महत्वाच्या बातम्या

 कृषी विज्ञान केंद्रात जैविक खते व ट्रायकोडर्मा मित्रबुरशी उपलब्ध : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जैविक खते वापरण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्राच्या जैविक खते प्रयोगशाळेत उत्पादित ट्रायकोडार्मा, रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघडविणारे जीवाणू फक्त २०० रुपये  प्रति लिटर दराप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात शेतीमध्ये खोल नांगरणी करून जमीन तापविणे म्हणजे जमिनीचे एकप्रकारे संस्करण केले जाते. त्यामुळे जमिनीमधील हानिकारक बुरश्या आणि जमिनीतील किडींच्या सुप्त अवस्था प्रखर सूर्यप्रकाशामुळे तसेच जमिनीचे तापमान वाढल्यामुळे मरण पावतात तसेच पक्षी किंवा जनावरे किडींच्या सुप्त अवस्थांना टिपून खाऊन कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन होत असते. परंतु यावर्षी खरीप हंगामपुर्वी एप्रिल व मे महिन्यामध्ये बरेच दिवस ढगाळ होते व अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळ्यात जमीन व्यवस्थितपणे तापली नाही. त्यामुळे अशी परिस्थिती येणाऱ्या खरीप हंगामात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

अशी परिस्थिती येत्या खरीप हंगामात उद्भवू नये यासाठी जमिनीची मशागत योग्यवेळी करून जमीन तापविणे, बियाण्याची उगवण क्षमता चांगली होणे, रोपांची वाढ सतेज होणे तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी रायझोबियम, स्फुरद विरघडविणारे जिवाणू, अॅझोटोबॅक्टर या जैविक खतांचा वापर करणे तसेच पिकावरील मर, मुळकुज रोग टाळण्यासाठी पेरणी अगोदर ट्रायकोडर्माची माती प्रक्रिया करणे, पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया करून पेरणी करणे तसेच आवळणी करणे गरजेचे ठरते.

जैविक खते, जीवाणू खते यामध्ये अॅझोटोबॅक्टर जैविक खत एकदल किंवा तृणधान्य पिकांमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. रायझोबियम जैविक खत हे फक्त शेंगवर्गीय किंवा द्विदल पिकांसाठी उपयोगी पडते.  स्फुरद विरघडविणारे जिवाणू जमिनीत अद्राव्य स्वरुपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून ते पिकास उपलब्ध करून देतात. त्यानंतर ट्रायकोडर्मा याजैविक मित्र बुरशीचा वापर मर, मुळकुज व खोडकुज रोगांच्या व्यवस्थापनासाठी केल्या जातो.

जैविक खते वापरण्याची पद्धत -

बीज प्रक्रिया : रायझोबियम, स्फुरद विरघडविणारे जिवाणू, अॅझोटोबॅक्टर पावडर स्वरुपात २५ ग्राम/१० ते २० मिली  प्रति किलो बियाणे याप्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करावी. स्फुरद विरघडविणाऱ्या जिवाणूचा वापर बियाण्यावर, रोपाच्या मुळावर अंतरक्षीकरण पद्धतीने वापर करतात किंवा शेणखतात मिसळून जमिनीवर फेकतात.

ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत -
बीज प्रक्रिया : पेरणीच्यावेळी ४ ते ५ ग्राम किंवा ५ ते १० मिली ट्रायकोडर्मा प्रती एक किलो बियाण्यास घेऊन बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.

माती प्रक्रिया : पेरणीपुर्वी किंवा पेरणीनंतर एक एकर क्षेत्रफळामध्ये ट्रायकोडर्मा मित्रबुरशी २ किलो/२ लिटर २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या व थोडाफार ओलावा असलेल्या शेणखतामध्ये मिसळवून घमेल्यात घेऊन एक एकर क्षेत्रफळामध्ये समप्रमाणात पसरविणे किंवा फेकून देणे किंवा ५ किलो ट्रायकोडर्मा भुकटी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावी व शक्य असल्यास पाणी द्यावे.

द्रावणात रोपे बुडविणे : गादी वाफ्यावर रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा ५०० ग्राम/लीटर ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्यात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी, असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos