महत्वाच्या बातम्या

 अतिदुर्गम टेकला ग्रामपंचायतीत आदि सेवा केंद्र सुरू


- २० प्रकारचे ऑनलाइन दाखले आता गावातच उपलब्ध; तालुका स्तरावर जाण्याची गरज संपली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ग्रामपंचायत टेकला येथील नागरिकांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावरच शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आदि सेवा केंद्र (मिनी सेतू केंद्र) चे ऑनलाइन उद्घाटन गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या सेवेमुळे टेकला ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आता विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी भामरागड तालुका मुख्यालय गाठण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्रामपंचायत स्तरावरच एकूण २० प्रकारचे ऑनलाइन दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दुर्गम भागातील नागरिकांना मोठा फायदा -
भामरागड तालुका हा अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो. टेकला ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांना यापूर्वी उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय दाखल्यांसाठी तालुका स्तरावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खर्ची पडत होता तसेच मजुरी व रोजगाराचे नुकसान आणि प्रवासाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. आता आदि सेवा केंद्रामुळे ही सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचणार आहे.

ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती -
या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला भामरागडचे नायब तहसीलदार आर. बी. निखाते, मंडळ अधिकारी पी. आर. मंडळ, टेकला ग्रामपंचायतीचे उपसरपंच बुकलु लेकामी, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. पी. वेलादी, ग्राम महसूल अधिकारी संदीप कोडापे, अंगणवाडी सेविका सीता पुंगाटी तसेच संगणक परिचालक जगदीश कोंडागुर्ले यांच्यासह किशोर दुर्वा, सूरज दुर्वा, कन्ना पिडसे, विष्णू पुंगाटी, विनोद पुंगाटी, लालसाय दुर्वा, पांडु बोगामी, सैनू दुर्वा, मधुकर दुर्वा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून शासनाचे आभार -
ग्रामस्थांनी आदि सेवा केंद्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नागरिकांनी सांगितले की, अशी सुविधा मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वी दाखल्यांसाठी तालुका स्तरावर जावे लागत होते. त्यामुळे रोजचा रोजगार बुडत होता आणि प्रवासासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत होता. आता गावातच सेवा उपलब्ध झाल्यामुळे आमचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. या सुविधेबद्दल समस्त टेकला ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानले आहेत.

डिजिटल सेवांमुळे प्रशासन नागरिकांच्या दारी -
आदि सेवा केंद्र ही सुविधा दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय सेवांशी जोडणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार असून, प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos