मध्यरात्री घरात घुसून तोडफोड : दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वॉर्ड परिसरात मध्यरात्री एका घरात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड करत दाम्पत्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विद्या बंडू पाटील (वय ५०) या आदर्श चौक, विद्यानगर वॉर्ड येथे वास्तव्यास असून १ जुलै रोजी पहाटे सुमारे २.३० वाजताच्या सुमारास आरोपी सुरज सुरमवार, त्याची पत्नी आफरीन तसेच त्यांच्यासोबत आलेली शिवानी पेंदाम हे त्यांच्या घरासमोर आले. तिघांनी घराचे गेट जोरजोरात वाजवून आरडाओरड सुरू केली.
आवाजामुळे फिर्यादी व त्यांचे पती जागे होऊन बाहेर आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपींनी घराच्या गेटवरून आत प्रवेश करून बेकायदेशीरपणे घरात घुसखोरी केली. त्यांनी फिर्यादीच्या मुलाचा शोध घेत तुझा मुलगा कुठे आहे, त्याला बाहेर काढ अशी धमकीची भाषा वापरली. मुलगा घरी नसल्याचे सांगूनही आरोपींनी घरातील सामानाची फेकाफेक केली. तसेच खुर्च्या आणि झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान केले.
फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी सुरज सुरमवार याची पत्नी फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करू लागले. त्यावेळी फिर्यादीच्या पतीने हस्तक्षेप करून त्यांना सोडविले.
त्यानंतर तिन्ही आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तुझा मुलगा जिथे दिसेल तिथे त्याला ठार मारू, अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले. घटनेच्या वेळी आरोपी सुरज सुरमवार याची पत्नी व त्यांच्यासोबत आलेली युवती या मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेमुळे आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत विद्या पाटील यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ३३३, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




