महत्वाच्या बातम्या

 शेतकरी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सह-पालकमंत्र्यांची गडचिरोली भेट : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे सह-पालकमंत्री आज गडचिरोली येथे भेट देत असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.

आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले की, शेतकरी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनस्थळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी व नागरिकांशी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्या, अडचणी व स्थानिक प्रश्न त्यांनी जाणून घेतले. शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेत आमदार नरोटे यांनी तत्काळ राज्याच्या सह-पालकमंत्र्यांशी भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर संवाद साधून परिस्थितीची माहिती दिली होती.

या संवादाची तातडीने दखल घेत सह-पालकमंत्र्यांनी स्वतः गडचिरोली येथे येऊन संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. शेतकरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून सर्वसमावेशक व योग्य तोडगा काढण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार नरोटे यांनी नमूद केले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रनयजी खुणे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भारतजी खटी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos