पोहण्याचा आनंद ठरला अखेरचा : महाराष्ट्र सुरक्षा जवानाचा नदीत बुडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पाटाळा – राळेगाव येथील रिठ नदी पात्रात पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने महाराष्ट्र सुरक्षा बलातील एका जवानाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत जवानाचे नाव विजय औंकार काळे (वय ३०) असे असून ते मूळचे दहेगाव ता. यावल, जि. जळगाव येथील रहिवासी होते. सध्या ते माजरी येथील विनायक नगर परिसरात वास्तव्यास होते. ते महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय काळे हे मंगळवारी दुपारी आपल्या मित्रांसह पाटाळा येथील रिठ नदी पात्रावर पोहण्यासाठी गेले होते. नदीतील एका तिरावरून दुसऱ्या तिराकडे त्यांचे मित्र पोहत गेल्यानंतर विजय काळे ही त्यांच्या मागोमाग पोहत होते. मात्र नदीतील खोल भागाचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले.
विजय पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आणि ते खोल भागात गेल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. काही क्षणांतच विजय नदीच्या पाण्यात बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अंधार झाल्याने शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. बुधवारी, आज पहाटे पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी विजय काळे यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला.
या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माजरी पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




