महत्वाच्या बातम्या

 लक्ष्मीनगरात गौराई म्हणजे महालक्ष्मीचे मंगलमय आगमन


- पारंपरिक संस्कृतीचा जागर : भक्तिभावाने गौराईची प्रतिष्ठापना

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी गौराई म्हणजे महालक्ष्मी या पारंपरिक श्रद्धाभावातून वैशाली विश्वम पडिशालवार व प्राची प्रशांत देशमुख यांच्या घरी गौराईचे विधिवत व उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापन करण्यात आले. गौराईच्या आगमनाने परिसरात भक्तिभाव, चैतन्य आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. महिलांनी पारंपरिक रितीरिवाजांचे पालन करीत गौराईचे मनोभावे स्वागत केले. 

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत गौराईच्या परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचे आगमन हा आनंदाचा आणि समृद्धीचा सोहळा मानला जातो. गौराई म्हणजे गणपतीची आई म्हणजेच माता पार्वतीचे मंगलमय स्वरूप मानले जाते. गौराई म्हणजे महालक्ष्मीचे स्वरूप, अशी श्रद्धा असून तिच्या आगमनाने घरात सुख, शांती, सौभाग्य, ऐश्वर्य व समृद्धी नांदते, अशी पारंपरिक धारणा आहे. त्यामुळे गौराईचे स्वागत हा केवळ धार्मिक विधी न राहता कुटुंबीयांच्या श्रद्धा, संस्कार व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा उत्सव ठरतो.

लक्ष्मीनगरातील महिलांनी गौराईच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. गौराई प्रतिष्ठापन घरात स्वच्छता, आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने गौराईची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. साडी, अलंकार आणि विविध दागिन्यांनी गौराईला सजविण्यात आले. मंगलगाणी, आरती आणि धार्मिक वातावरणामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी गौराईचे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. महिला, युवती, युवक, बालक व पुरुष मंडळींनीही गौराईचे दर्शन घेत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे लक्ष्मीनगर परिसरातील गणेशोत्सवाला अधिकच मंगलमय व भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशी गौराईला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.





  Print






Related Photos