माजरी पोलिसांची तत्पर कारवाई : चार तासांत मोटारपंप चोरीचा छडा, तिघे ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतातील सिंचनासाठी वापरण्यात येणारा विद्युत मोटारपंप चोरीला गेल्याच्या घटनेचा माजरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला. या प्रकरणात शंकर महादेव आगलावे ३० वर्षे रा. पाटाळा, राकेश दामोधर ढवस ३३ वर्षे रा. नागलोन आणि जितेंद्र सुधाकर खामनकर ३६ वर्षे रा. राळेगाव, तिघेही तालुका भद्रावती, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मोटारपंप आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरोरा येथील बावणे ले-आउट परिसरात राहणारे हनुमान विठ्ठल खिरटकर ६० वर्षे यांच्या शेतातील वर्धा नदीजवळ लावलेला वरुना कंपनीचा विद्युत मोटारपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या मोटारपंपाची किंमत अंदाजे आठ हजार रुपये होती. १ नोव्हेंबर रोजी ही घटना लक्षात आल्यानंतर खिरटकर यांनी माजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच माजरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी अवघ्या चार तासांत चोरीचा उलगडा केला. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला वरुना कंपनीचा विद्युत मोटारपंप किंमत ८ हजार रुपये)ल तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच ३४/सीएस ५३३७, किंमत ७० हजार रुपये असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष वाकडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, पोलीस शिपाई अनिस शेख, नितीन मराठे, ज्ञानेश कोटरंगे यांनी केले.




Petrol Price




