महत्वाच्या बातम्या

 मोहफूल वेचतांना वाघाचा हल्ला, एक जण ठार : नागभीड तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : मोहफूल वेचण्यासाठी गावाजवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड येथून जवळच असलेल्या तुकूम गट नंबर ६०५ मध्ये मंगळवारी दुपारी दाेन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अरुण महादेव रंधये वय ५६ असे मृताचे नाव आहे.

अरुण रंधये हे मंगळवारी सकाळी गावाशेजारी असलेल्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. मोहफूल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीय आणि शेजारील नागरिकांनी जंगलात जाऊन शोधाशोध केली. यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. लगेचच वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.


नागरिक दहशतीत :  मागील चार महिन्यात नागभीड तालुक्यात वाघांनी हल्ला करून व्यक्तींना ठार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. १२ मार्च २०२३ रोजी नागभीडजवळील शिवटेकडीजवळ वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होईल. वाघांच्या अशाच घटना घडत राहिल्या तर जंगलव्याप्त गावातील नागरिकांकडून आपली उपजीविका कशाच्या आधारावर करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  Print


News - Chandrapur
Related Photos