महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात पोलिसांचा धडक संदेश : पोक्सो व बलात्कार प्रकरणांतील आरोपींची पोलीस मुख्यालयात परेड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत पोक्सो (POCSO) आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींची विशेष परेड आयोजित केली. शनिवारी चंद्रपूर पोलीस मुख्यालयात झालेल्या या परेडमध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या पोक्सो व बलात्कार प्रकरणांतील आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

सदर परेड पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परेडदरम्यान आरोपींची उपस्थिती तपासण्यात आली तसेच त्यांच्या सध्याच्या हालचाली, वर्तन आणि गुन्हेगारी नोंदींचा आढावा घेण्यात आला.

महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आरोपींना कायद्याचा धाक दाखविणे, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आणि भविष्यात अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ न देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

परेडदरम्यान जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना पीडित, साक्षीदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणे, दबाव टाकणे अथवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशी कडक ताकीद देण्यात आली. अशा प्रकारची कोणतीही तक्रार आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

चंद्रपूर पोलीस दलाने महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात शून्य सहनशीलता धोरण अवलंबले असून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच पीडित कुटुंबीयांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून महिलांवरील व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणतीही संशयास्पद माहिती अथवा गुन्ह्याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले असून महिला व बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos