महत्वाच्या बातम्या

 आयुष्मान कार्ड नोंदणीसाठी शहरीभागात वार्डनिहाय मोहिम राबवा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धीनी समितीचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत जनआरोग्य योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना विनामुल्य आरोग्य सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक योजनेंतर्गत पात्र होण्यासाठी शहरी भागात वार्डनिहाय मोहिम राबवा, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धीनी समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.रा.ज.पराडकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आयुष्मान कार्ड नोंदणीचे ग्रामीण भागातील प्रमाण ९० टक्केपेक्षा अधिक आहे. परंतू शहरी भागात नोंदणी कमी असल्याने ही नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरी भागात नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने वार्डनिहाय मोहिम राबविणे अधिक उपयुक्त ठरेल. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील आरोग्य सुविधा अधिक अद्यावत कशा करता येतील तसेच या संस्थांसाठी कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर प्रस्ताव करण्यात यावा. याबाबत आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन सुविधांच्या पुर्ततेसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करु. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक आरोग्य कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याची खात्री विभागाने करावी. ज्याज्या ठिकाणी शस्त्रक्रियागृह आहेत, ते सुस्थितीत आणि वापरात असणे आवश्यक असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर यंत्रणा बसविण्यात आली आहे, परंतू वानरांच्या उपद्रवामुळे काही ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त होते. सोलर बसवितांनाचा संबंधित कंत्राटदाराने दहा वर्ष या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात यावी. यापुढे सोलर बसवितांना संरक्षक पिंजरा त्याभोवती असावा, अशी तरतूद करण्यात यावी. जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी डिसेंबर अखेरचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या नव्या व्हीबीजी रामजी या योजनेतून आरोग्य संस्थांची दुरुस्ती, वॅाल कम्पाऊंडसारखी कामे करता येऊ शकतात. त्यामुळे या योजनेतून कामे प्रस्तावित करावी, असे आ.वानखेडे म्हणाले. आष्टी तालुक्यात आणखी एक १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, कारंजा येथील ट्रॅामा केअर सेंटर पुर्ण क्षमतेते कार्यान्वित व्हावे, आर्वी येथे वैद्यकीय अधिकारी पदे देण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बायोमेट्रीक प्रणाली बसवावी, असे आ.वानखेडे म्हणाले. सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा सादर केला.





  Print






News - Wardha




Related Photos