महत्वाच्या बातम्या

 सुरगावात घराला भीषण आग : आठ लाखांचे नुकसान


- रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व वर्कशॉपचे साहित्य जळून खाक; शासनाकडे मदतीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : तालुक्यातील सुरगाव येथे घराला लागलेल्या भीषण आगीत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, गृहोपयोगी साहित्य आणि इलेक्ट्रिक व वेल्डिंग वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक झाले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शब्बीर समशेर खाँ पठाण यांच्या कुटुंबाचे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पीडित कुटुंबाने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर पठाण यांच्या घरातच इलेक्ट्रिक व वेल्डिंग वर्कशॉपचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी शब्बीर पठाण आणि त्यांची पत्नी गावातील आठवडी बाजारात खरेदीसाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घर आणि दुकानाला विळखा घातला.

घराला आग लागल्याची माहिती मिळताच शब्बीर पठाण दाम्पत्याने तातडीने घराकडे धाव घेतली. दरम्यान, ग्रामस्थांनीही घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेल्याने सेलू आणि वर्धा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. आगीत संसारोपयोगी वस्तूंसह व्यवसायासाठी लागणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात नष्ट झाले.

बचत गटाची रोख रक्कमही आगीत जळाली -
शब्बीर पठाण यांच्या पत्नी या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. बचत गटाची घरी ठेवलेली सुमारे १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सात तोळे सोन्याचे दागिने, सुमारे ४०० ग्रॅम चांदी, घरातील गृहोपयोगी साहित्य आणि इलेक्ट्रिक-वेल्डिंग वर्कशॉपमधील साहित्य आगीत जळून खाक झाले.

पोलिसांकडून पंचनामा; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट -
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पंकज वाघोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक निरंजन वरमे आणि तुषार भोंबे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचा शोध घेतला जात असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तहसीलदारांनी केली नुकसानीची पाहणी -
घटनेनंतर गुरुवारी सकाळी तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा अंदाज घेतला. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक कलोडे, प्रशासक गोलू शेख, बाजार समितीचे संचालक श्याम पाटील वानखेडे, ग्राम महसूल अधिकारी कांचन कडू, ग्रामसेवक निखिल शेटे, पोलिस पाटील रसिका कांबळे, महसूल सेवक मंगेश निधेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आगीत घर आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याने शब्बीर पठाण कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले असून, त्यांनी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos