महत्वाच्या बातम्या

 शाळा-कॉलेजपर्यंत मोफत एसटी प्रवास : चंद्रपूर जिल्ह्यात ६,०२१ विद्यार्थिनींना मोफत पास, ३,७१९ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रवासाच्या अडचणींमुळे खंडित होऊ नये आणि आर्थिक कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाकडून विविध सवलत व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

चालू शैक्षणिक सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा एसटी प्रशासनाने थेट शाळांमध्ये जाऊन पासचे वितरण करण्याची विशेष मोहीम राबविली आहे.

महामंडळाच्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत १७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ६ हजार २१ विद्यार्थिनींना मोफत एसटी पास वितरित करण्यात आले आहेत. तर ३ हजार ७१९ विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च कमी होऊन शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी शंभर टक्के मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणातील गळती रोखण्यास मोठी मदत होत असून, अनेक विद्यार्थिनींसाठी ही योजना आधार ठरत आहे.

जिल्ह्यातील विविध आगारांमधून वितरित करण्यात आलेल्या पासची संख्या पुढीलप्रमाणे आहे. चंद्रपूर आगारातून २,२१७ विद्यार्थिनींना मोफत व ९४६ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, राजुरा आगारातून ६५७ विद्यार्थिनींना मोफत व ७५८ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, चिमूर आगारातून १,५६० विद्यार्थिनींना मोफत व ८३३ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, तर वरोरा आगारातून १,५८७ विद्यार्थिनींना मोफत आणि १,१८२ विद्यार्थ्यांना सवलतीचे पास देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचा नियमित प्रवास अधिक परवडणारा व्हावा यासाठी एसटी महामंडळाकडून मासिक पासवर ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. याशिवाय शैक्षणिक सहली, परीक्षा कालावधी, उन्हाळी सुट्ट्या, अधिकृत शैक्षणिक शिबिरे तसेच आजारी पालकांना तातडीने भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासावरही विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवास सवलत दिली जाते.

यंदा विद्यार्थ्यांना आगारात जाऊन पास काढण्यासाठी वेळ वाया जाऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने थेट शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विशेष शिबिरे आयोजित केली. या शिबिरांमधून हजारो विद्यार्थ्यांना जागेवरच पास वितरित करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रवाशांना अधिक आधुनिक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पारंपरिक कागदी पासऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) देण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल व्यवस्थेमुळे भविष्यात विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

बसफेऱ्यांचे वेळापत्रक, पास वितरण किंवा इतर कोणत्याही अडचणीबाबत विद्यार्थ्यांनी थेट एसटी महामंडळाच्या १४९ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी वाहतुकीच्या सुविधेअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा एसटी महामंडळाचा मुख्य उद्देश आहे. थेट शाळांमध्ये जाऊन पास वितरण करण्याच्या विशेष मोहिमेला यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन हेमंत गोवर्धन, बसस्थानक प्रमुख, चंद्रपूर यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos