महत्वाच्या बातम्या

 पुरामुळे बल्लारपूर–राजुरा मार्ग बंद : तेलंगणाकडे जाणारी वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून बल्लारपूर–विसापूर मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने बल्लारपूर–राजुरा मार्गही बंद करण्यात आला असून विसापूर–नांदगाव पोडे मार्गही पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने सास्ती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

बल्लारपूर–राजुरा मार्ग बंद झाल्यामुळे तेलंगणाकडे जाणारी प्रमुख वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी बल्लारपूर शहरात मालवाहू ट्रक, बस आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. पर्यायी मार्गांवरही वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.

वर्धा व इरई नद्यांनी धोकादायक पातळी गाठली असून अनेक लहान-मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून सर्व संबंधित विभागांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. इरई धरणाच्या जलसाठ्यातही वेगाने वाढ होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

नागरिकांनी नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून परिस्थितीवर चोवीस तास नजर ठेवली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos