स्वामित्व योजनेत जिल्ह्यातील ७० हजार ९८० नागरिकांना मालमत्ता सनद


- आधुनिक ड्रोन व जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावठाण भूमापन; १.९४ लाखांहून अधिक सनद तयार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील गावठाणातील मालमत्तांना अधिकृत ओळख, कायदेशीर मान्यता आणि मालकी हक्काचा ठोस पुरावा मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. भूमी अभिलेख विभागाने आधुनिक ड्रोन व जीआयएस (GIS) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावठाणाचे अचूक भूमापन करून आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२२ मालमत्ता सनद तयार केल्या असून, त्यापैकी ७० हजार ९८० नागरिकांना मालमत्ता सनदांचे वितरण करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील गावठाणांमध्ये वाढती लोकसंख्या, नवीन बांधकामे आणि मालमत्तांच्या हस्तांतरणामुळे मोठ्या प्रमाणावर भौगोलिक बदल झाले आहेत. अनेक गावांमध्ये गावठाणाचे अद्ययावत व अचूक अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे मालमत्तेच्या सीमा, क्षेत्रफळ आणि मालकी हक्काबाबत अनिश्चितता निर्माण होत असते. त्यामुळे मालमत्ता कर आकारणी, बांधकाम परवानग्या, बँक कर्ज, मालकी हक्कांचे संरक्षण आणि ग्रामपंचायतींचे प्रशासन यामध्ये विविध अडचणी निर्माण होतात.
या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वामित्व योजनेअंतर्गत आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावठाणाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल नकाशे तयार करून प्रत्येक मालमत्तेचे अचूक क्षेत्रफळ निश्चित केले जाते. त्यावर आधारित मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) तयार करून संबंधित मालमत्ताधारकांना अधिकृत सनद वितरित केली जाते. त्यामुळे मालमत्तेच्या मालकीला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होत असून भविष्यातील वाद कमी होण्यास मदत होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात महसुली गावांची एकूण संख्या १,८१३ असून त्यापैकी १,२०३ गावांमध्ये गावठाण भूमापनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १,१५२ गावांतील सनद तयार करण्यात आल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाने तयार केलेल्या १ लाख ९४ हजार ३२२ सनदांपैकी ७० हजार ९८० सनद विविध विशेष शिबिरांद्वारे तसेच संबंधित कार्यालयांतून नागरिकांना वितरित करण्यात आल्या आहेत. सनद वितरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू असून, ज्या नागरिकांनी अद्याप सनद घेतलेली नाही त्यांनी संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन आपले नाव व गावाची माहिती देऊन सनद प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
तालुकानिहाय सनद वितरण -
भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक ८ हजार ९१५ नागरिकांना मालमत्ता सनद देण्यात आली आहे. त्यानंतर नागभीड (६,२०६), भद्रावती (६,१५६), चंद्रपूर (६,००४), कोरपना (५,३९९), वरोरा (५,३०३), सिंदेवाही (४,३४४), सावली (४,२७२), मुल (४,२२३), जिवती (४,०९९), गोंडपिपरी (३,८४७), राजुरा (३,८२३), पोंभुर्णा (३,१७२), चिमूर (२,७०७) आणि बल्लारपूर (२,५१०) तालुक्यातील नागरिकांना सनदांचे वाटप करण्यात आले आहे.
ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींसाठी अनेक फायदे -
स्वामित्व योजनेमुळे गावठाणातील प्रत्येक मालमत्तेचे अचूक सर्वेक्षण होऊन डिजिटल नकाशे तयार होत आहेत. प्रत्येक मिळकतीचे निश्चित क्षेत्रफळ नोंदवून मालमत्ता पत्रिका तयार होत असल्याने मालकी हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळत आहे. या सनदेच्या आधारे बँक कर्ज व इतर आर्थिक सुविधा मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.
याशिवाय गावातील सार्वजनिक जागांच्या सीमा स्पष्टपणे निश्चित झाल्यामुळे अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. मालमत्तांच्या स्पष्ट सीमांकनामुळे मालकी हक्क व हद्दींसंदर्भातील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. जीआयएस आधारित मालमत्ता कर निर्धारण नोंदवही (नमुना-८) स्वयंचलित पद्धतीने तयार होत असल्याने कर आकारणी अधिक अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कर संकलनात वाढ होऊन महसूल वाढण्यास मदत होईल.
तसेच अद्ययावत डिजिटल नकाशे व अभिलेख उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायतींना कर आकारणी, बांधकाम परवानग्या, अतिक्रमण निर्मूलन, विकास नियोजन आणि इतर प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांना अधिकृत ओळख मिळण्याबरोबरच ग्रामपंचायतींचे प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




