प्रलंबित मागण्यांसाठी गडचिरोलीतील परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन : शासनाला निवेदन, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या आवाहनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील परिचारिकांनी मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी दोन तासांचे लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच महिला व बाल रुग्णालयांतील परिचारिकांनी काम बंद ठेवत रुग्णालय परिसरात निदर्शने केली. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागातील सेवाविषयक अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही शासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील परिचारिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि महिला व बाल रुग्णालयांमधील परिचारिकांनी दोन तासांचे कामबंद आंदोलन केले. या कालावधीत नियमित आरोग्य सेवांवर परिणाम झाला असून रुग्णसेवेत काही प्रमाणात खोळंबा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गव्हर्नमेंट नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रचना मकासरे, नागपूर विभागीय उपाध्यक्ष तथा कोषाध्यक्ष कविता नांदगाये यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या.
प्रमुख मागण्या -
परिचारिकांनी शासनाकडे खालील मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करण्यात यावेत.
नवीन आकृतिबंध तयार करून त्यास त्वरित शासन मान्यता द्यावी.
परिचर्या संवर्गातील सर्व प्रलंबित पदोन्नत्या तातडीने पूर्ण कराव्यात.
आरोग्य विभागातील रिक्त पदांवर सरळ सेवेने भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
परिचारिका संवर्गाच्या सर्व सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर निश्चित कालमर्यादेत ठोस निर्णय घ्यावा.
शासनाला इशारा -
परिचारिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिका संवर्गाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. दोन तासांच्या लाक्षणिक आंदोलनानंतरही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन आरोग्य व्यवस्थेतील असंतोष दूर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




