ज्ञानाची शिदोरी देत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख : आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे, या विचाराने प्रेरित होत उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्या जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजवाडा येथे डीबीए पब्लिक स्कूल येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅग, नोटबुक व कंपास पेटीचे वाटप करण्यात आले.
यावेळी वितरित करण्यात आलेल्या शालेय बॅगवर उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे असून, ज्ञानाची शिदोरी-उज्ज्वल भविष्याची तयारी हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही विद्यार्थी केवळ शैक्षणिक साहित्याअभावी मागे राहू नये, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः शैक्षणिक साहित्याचे वाटप करत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित शिक्षक-शिक्षिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, शाळेतील शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




