महत्वाच्या बातम्या

 महाकाळी ले-आऊट परिसरातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला : आत्महत्येचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाकाळी ले-आऊट, मोरांगणा परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेदिका अवथळे १७ वर्षे रा. मोरांगणा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका ही खरांगणा येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. ती घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक व परिचितांनीही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी महाकाळी शिवारातील एका विहिरीत वेदिकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, ही आत्महत्येची घटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वेदिकाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे मोरांगणा व परिसरात शोककळा पसरली असून, वेदिकाच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Wardha




Related Photos