महत्वाच्या बातम्या

 ऑपरेशन शोध-४ अंतर्गत मोठे यश : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा नागपुरातून शोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन शोध-४ मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB), मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) व सायबर सेलच्या संयुक्त पथकाने वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन बालिकेचा तसेच आरोपीचा यशस्वी शोध लावून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती दिली आहे.

पोलीस स्टेशन चिमूर येथे अपहरण प्रकरणी अप. क्र. ४१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२)  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांक नागपूर जिल्ह्यातील मौजा गुंमथळा, ता. कामठी येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर प्राप्त कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून पीडित बालिका आणि संशयित सरगम केशव बावणे (२५ वर्षे), रा. मोटेगाव, ता. चिमूर हे नागपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली.

प्राप्त माहितीच्या आधारे AHTU, LCB व सायबर सेलच्या पथकाने तातडीने नागपूर येथे शोधमोहीम राबवून १५ जून २०२६ रोजी मौजा गुंमथळा, ता. कामठी, जिल्हा नागपूर येथून बालिका व आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी दोघांनाही पोलीस स्टेशन चिमूर यांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईमुळे वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उलगडा होऊन पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तसेच ऑपरेशन शोध-४ अंतर्गत बेपत्ता व्यक्ती व बालकांच्या शोधासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची परिणामकारकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

या यशस्वी कारवाईत AHTU/LCB व सायबर सेल, चंद्रपूर येथील पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, संतोष निंभोरकर तसेच पोलीस अंमलदार चेतन गज्जरलावार, सुमीत बर्डे, दिनेश आरडे, ऊषा लेडांगे, गुनवंत मुंडके आणि कार्तिक खनके यांनी सहभाग घेतला.





  Print






News - Chandrapur




Related Photos