महत्वाच्या बातम्या

 महिलेच्या घरात घुसून विनयभंग : भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात एका ३९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात मध्यरात्री बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सूरज रामभवन पांडे यांच्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार ६ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलांसह घरी झोपलेली होती. त्यावेळी तिचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. अचानक घराचे दार जोरात ठोठावल्याने महिला जागी झाली. तिने दार उघडताच नगरसेवक सूरज पांडे समोर उभे असल्याचे दिसले.

तुझा नवरा कुठे आहे, त्याने मला शिवीगाळ केली आहे. असे म्हणत आरोपीने महिलेला अश्लील शब्दांत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेला अश्लील स्पर्श करून तिला ढकलत जबरदस्तीने घरात प्रवेश केला. यावेळी मी नगरसेवक आहे. तुला आणि तुझ्या पतीला जीवानिशी ठार मारीन तसेच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी आरोपीने दिली. धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी तिच्या मदतीसाठी धावून आले. शेजारी   येत असल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ गडचांदूर पोलीस ठाणे गाठून नगरसेवक सूरज रामभवन पांडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७४, ७९, ३२९(३) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत असून, शहरातील लोकप्रतिनिधीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos