महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत तीन महिन्यांच्या बिबट पिल्लाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह काजीपेठ रेल्वे डाउन लाईनवरील राजुरा वनपरिक्षेत्र मधील नलफडी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७९ मध्ये रेल्वेच्या धडकेत एका मादी बिबट पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ९ जून रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास पोल क्रमांक १५५/४१ जवळ घडला.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे तीन महिन्यांचे मादी बिबट पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत बिबटाचे शरीर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले.

शवविच्छेदन डॉ. एन. पी. तेलंगे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रजुरा यांच्या मार्फत करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबटाचे दहन करण्यात आले.

प्राथमिक तपासणी व शवविच्छेदन अहवालानुसार, रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने बिबट पिल्लाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे निर्माण झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले असून, वन्यजीव जखमी अथवा मृत अवस्थेत आढळल्यास तात्काळ जवळच्या वन कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos