गव्हाच्या आडून चालायची गुटख्याची वाहतूक : दोघांना अटक, ९ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी मुंबई : गव्हाच्या आडून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५० हजाराचा गुटखा व ९ लाख ४० हजाराचा गहू जप्त करण्यात आला आहे. पावणे एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.
पावणे एमआयडीसी परिसरात एका टेम्पो मधून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये संशयित वर्णनाचा टेम्पो पोलिसांनी अडवला होता. टेम्पोच्या झडतीमध्ये त्यातील गोण्यांमध्ये गहू आढळून आला. मात्र माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी सर्व गोण्या तपासल्या असता त्यात काही गोण्या गव्हाच्या तर काही गोण्या गुटख्याच्या आढळून आल्या. त्यावरून संबंधितांकडून गव्हाच्या आडून गुटखा वाहतूक चालायची हे उघड झाले.
याप्रकरणी टेम्पो चालक शैलेश सिंग (२७) व सहकारी रिपन देव (२४) या दोघांवर गुटखा वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांनी हा गुटखा बोनकोडे येथील अनिरुद्ध महेश्वरी व कोपरी येथील पवन गुप्ता यांच्या मागणीप्रमाणे घेऊन आल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ५० हजाराच्या गुटख्यासह ९ लाख ४० हजाराचा गहू देखील जप्त केला आहे. शिवाय गुन्ह्यासाठी वापरलेला टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून त्यामध्ये इतरही काहींची नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
News - Rajy