महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ : शेतकऱ्याचे मोठे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील नगरी येथे रानटी हत्तींच्या कळपाने शेतात अचानक शिरकाव करून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. हत्तींच्या या हल्ल्यामुळे स्थानिक शेतकरी मनोहर कुंभारे यांचे अंदाजे १ ते दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

लाखो रुपयांचे कुंपण आणि पिके केली नष्ट
शेतकरी मनोहर कुंभारे यांनी रानटी जनावरांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण शेताभोवती लाखो रुपये खर्चून जाळीचे मजबूत फेन्सिंग (कुंपण) लावले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास आलेल्या रानटी हत्तींनी हे लोखंडी कुंपण आणि काँक्रीटचे मजबूत खांब पूर्णपणे तोडून शेतात प्रवेश केला. शेतात शिरल्यानंतर हत्तींनी आंबे लागलेल्या अनेक झाडांची मोठी मोडतोड केली, तसेच बांबूची झाडेदेखील मुळासकट उपटून टाकली. या संपूर्ण हैदोसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

वनविभागाकडून पंचनाम्यास दिरंगाई; शेतकरी संतप्त
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी कुंभारे यांनी तातडीने शनिवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पाचभाई यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, दुपार उलटून गेल्यानंतरही वनविभागाचे कोणतेही पथक किंवा कर्मचारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोहोचले नाही. वनविभागाच्या या उदासीन आणि धीम्या कारभारामुळे बाधित शेतकऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माणसाला मोल नाही का? – शेतकऱ्याचा उद्विग्न सवाल
आपली व्यथा मांडताना पीडित शेतकरी मनोहर कुंभारे म्हणाले, आम्ही हत्ती किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्यांच्या विरोधात नाही. आम्ही त्यांना स्वतःहून कोणतीही इजा पोहोचवू शकत नाही, कारण तसे केल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होईल किंवा थेट फाशीला सामोरे जावे लागेल.

मग आमच्या पिकांच्या आणि जगण्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? वनविभागाने या प्राण्यांचे काहीतरी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हत्तीने एखाद्या माणसाला मारल्यानंतर शासन केवळ काही रुपयांची नुकसानभरपाई देते, पण गेलेला माणूस परत येत नाही. त्यामुळे या देशात माणसाला मोल आहे की जनावराला, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos