लोकवर्गणीतून उभारल्या जाणाऱ्या दुर्गा मंदिराचे योगिता पिपरे यांच्या हस्ते भूमिपूजन


- एकता चौक, इंदिरानगर येथे दुर्गा मंदिराच्या उभारणीला प्रारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : इंदिरानगर येथील एकता चौक परिसरात लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या दुर्गा मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्षा) योगिता पिपरे यांच्या शुभहस्ते धार्मिक वातावरणात आणि उत्साहात पार पडले.
परिसरातील भाविक, नागरिक आणि जय दुर्गा उत्सव मंडळाच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून या मंदिराची उभारणी करण्यात येत असून, या मंदिरामुळे परिसरात धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात प.पू. शर्मा महाराज यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजा-अर्चना आणि भूमिपूजनाने करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना योगिता पिपरे म्हणाल्या की, लोकसहभागातून उभारले जाणारे मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून समाजातील ऐक्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. अशा धार्मिक स्थळांमुळे समाजामध्ये एकोपा वाढतो, सामाजिक सलोखा दृढ होतो आणि भावी पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा व धार्मिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळते. मंदिर उभारणीसाठी लोकवर्गणीतून योगदान देणाऱ्या सर्व दानशूर नागरिकांचे त्यांनी अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा नगर परिषद गडचिरोलीचे बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, अमित चापले, धनंजय भैसारे, देव नैताम, चेतन बलमवार, प्रफुल्ल शुद्धलवार, दत्तश्री नैताम, अजय पेंदोरकर, विक्की कागदलवार तसेच जय दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक उत्साह, वैदिक मंत्रोच्चार आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मंदिराच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असून, हे मंदिर भविष्यात परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




