पोलिस भरतीची १२ डिसेंबरला मैदानी चाचणी , जानेवारीत लेखी परीक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वुत्तसंस्था / सोलापूर : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबर पासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे. उमेदवारांनी आरक्षण निहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे. परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे. भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.
पोलिस भरतीची स्थिती
एकूण जागा
१७,१३०
अर्ज करण्याची मुदत
३० नोव्हेंबर
मैदानी चाचणीची तारीख
१२ डिसेंबर
लेखीचा संभाव्य महिना
जानेवारी २०२३
नॉन क्रिमिलिअरची चिंता नको
पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्या संदर्भातील नॉन क्रिमिलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमिलिअरची मुळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन तेव्हाचे नॉन क्रिमिलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमिलिअरची भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.
News - Rajy