धान मळणीत काळाचा घाला : थ्रेशरमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : धान मळणीच्या कामादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून एका निलंबित वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी १ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सचिन देवराम हलामी (वय ३०, रा. ईरुपटोला) असे मृतकाचे नाव आहे. सचिन हलामी हा यापूर्वी वनविभागात वनरक्षक पदावर कार्यरत होता. मात्र काही वर्षांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तो आपल्या मूळ गावी ईरुपटोला येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. उपजीविकेसाठी तो ईरुपटोला येथीलच उमाजी जनबंधू यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक तसेच हमाल म्हणून काम करीत होता.
सध्या परिसरात सर्वत्र धान मळणीचा हंगाम सुरू आहे. बुधवारी मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणीचे काम सुरू होते. यावेळी थ्रेशर मशीन चालू असतानाच अचानक तोल गेल्याने सचिन हलामी याचे शरीर थ्रेशरमध्ये अर्ध्याहून अधिक शिरले. मशीनचा वेग अधिक असल्याने काही क्षणांतच गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सचिनचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मळणीचे काम तात्काळ थांबवण्यात आले. घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता.
या प्रकरणी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा उपपोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मृत सचिन हलामी यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी असून, कुटुंबाचा आधार हरपल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




