बल्लारपूरमध्ये घरात कुटुंबीय असतानाच मध्यरात्री चोरी : रोख रु.१९ हजारांवर चोरट्यांचा डल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील बालाजी वॉर्ड परिसरातील एकदंत लॉनजवळ राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत रोख १९ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. घरात कुटुंबातील सदस्य झोपेत असतानाच चोरट्यांनी ही चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रमेश सदाफुले (वय ३४) हे आपल्या वडिलांसोबत बालाजी वॉर्ड, एकदंत लॉनजवळ राहतात. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. शनिवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता गणेश व त्यांचे वडील जेवण करून झोपले होते. पहाटे २.१५ वाजता गणेश यांना जाग आल्याने ते दुचाकीने रेल्वे चौक येथे चहा पिण्यासाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
घरी परतल्यानंतर पाहणी केली असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून अलमारीतील १० हजार रुपये तसेच कपाटात ठेवलेले ९ हजार रुपये, असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी वस्ती विभागातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे बल्लारपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे हे स्वतः रात्री गस्त घालत असले तरी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून नियमित व प्रभावी गस्त होत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची गस्त अधिक कडक करून चोरट्यांवर अंकुश आणावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




