महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी : आदिवासी व ग्रामीण खेळाडूंना नवी संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असून, यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवक-युवतींना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात तिरंदाजी खेळासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. ही प्रबोधिनी आदिवासी विकास विभागामार्फत कार्यान्वित केली जाणार असून, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे तिरंदाजीसाठी नैसर्गिक क्षमता असलेल्या खेळाडूंसाठी ओळखले जातात. या भागातील युवक-युवतींना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक वातावरण मिळावे यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यातूनच या प्रबोधिनीला मंजुरी मिळाल्याचे बोलले जात आहे.

या प्रबोधिनीच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील होतकरू खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात या केंद्रातून देशासाठी पदके जिंकणारे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे तिरंदाज घडतील, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईकें यांचे विशेष आभार मानले. जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले.

बल्लारपूर येथे उभारण्यात येणारी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवा खेळाडूंसाठी प्रगतीचे नवे दालन ठरणार असल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos